सण वार
शिमगो आलो रे...
सण वार

शिमगो आलो रे...


holi or shimaga  in kokan
ढोल-ताशांच्या गजरात कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस संपूर्ण कोकणात जल्लोषाचं वातावरण असणार आहे ...
शिमगोत्सावाच्या पहिल्याच दिवशी गावातील ग्रामस्थांनी जंगलात जाऊन होळीसाठी निश्चित केलेल्या झाडाची विधिवत पूजा करुन रात्री उशिरा ही होळी वाजतगाजत गावात आणली जाते .
गावातील तरुण वर्गाने उंच उडवत आणि नाचवत आणलेल्या या होळीचं स्थान वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार निश्चित असते.शिमगोत्सवाच्या काळात ग्रामदेवतेची पालखी ठेवण्याचं स्थानही निश्चित असतं. या स्थानाचीही पूजा केली जाते.
जंगलातून आणलेल्या शेवरीच्या झाडाच्या होळीला मानाचे नारळ बांधले जातात. वाडीतील सगळे ग्रामस्थ एकत्र येत मग मोठ्या काठ्यांच्या सहाय्याने होळी उभी करतात .गावाप्रमाणे वाडीवाडीत उभ्या राहणाऱ्या या होळयांच्या पूजनाचे मानही निश्चित असतात. त्याच घराण्यांना पूजनाचा मान देऊन होळीचे होम पेटवले जातात .

होळीचा होम पेटला की इथे जमलेला अगदी प्रत्येकजण होळीच्या फाका घालत (बोंबा मारत) आपल्या ग्रामदेवतेचा जयजयकार करतात. याच वेळी गावाच्या मंदिरात ग्रामदेवतेची पालखी सज्ज होते. पालखीत ग्रामदेवतेला रूप लावली जातात आणि ही पालखी वाजतगाजत गावातील घराघरात नेली जाते. वर्षातून एकदा घरी येणाऱ्या ग्रामदेवतेचं प्रत्येक कोकणी माणूस जल्लोषात स्वागत करतो. इथंही गावाच्या खोताचा मान पहिला असतो. पालखी प्रथम त्याच्या घरी नेली जाते, त्यानंतर वर्षानुवर्षाच्या मानाप्रमाने पालखी इतर ग्रामस्थांची घरी येते.

palakhi in shimaga in kokan
कोकणात गावागावातील ग्रामदेवता एकदाच पालखीत बसून बाहेर पडतात आणि विविध गावातील देवतांच्या भेटी घेतात. गावाची पालखी ग्रामदेवतेच्या सहाणेवर आली की संपूर्ण गाव एकत्र येतो आणि गावाचा शिमगोत्सव साजरा होतो. ढोल- ताशे या कोकणातील पारंपारिक वाद्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ठेक्यात निघालेल्या पालख्या, गावकऱ्यांनी घातलेलं ग्रामदेवतेचं गाऱ्हाणं यामुळे शिमगोत्सावाच्या काळात संपूर्ण कोकणात एक मंतरलेलं वातावरण असतं.
जगाच्या कानाकोपऱ्यात कामधंद्याच्या निमित्ताने गेलेला कोकणाचा चाकरमानी या काळात आवर्जून आपल्या गावात दाखल होतो. पुढील दहा दिवसात कोकणच्या गावागावात रंगणारा हा शिमगोत्सव खऱ्या अर्थाने कोकणातील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवतो आणि म्हणूनच तो वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.


  -आरती मुळीकपरब 

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email :  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
होळी, शिमगा , रंगपंचमी
सण वार

होळी रे होळी…

holi हिवाळ्यातली हाडं गोठवणारी भटकंती करता करता ऊन तापू लागले आणि रानात पळस पेटले की समजावे आता दिवसाच्या भटकंतीला आराम देण्याची वेळ आली आहे.

आले आहेत, थंडीचे पानगळीचे दिवस जाऊन नवे साज घेऊन लवकरच चैत्रपालवी लवलवण्याचे दिवस. आंब्याला लगडलेल्या बाळकैर्‍या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस. सुगीची आणि खळ्याची कामं संपून घरात धान्याच्या राशी लावण्याचे दिवस. सगळे कसे नवेनवे.

ऋतूंच्या या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावरचा रंगीत उत्सव म्हणजेच वसंतोस्तव. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने  साजरा केला जाणारा हा उत्सव. म्हणजेच आपला शिमगा आणि होळी. रंगांची होळी भारतभर वेगवेगळ्या रुपांत खेळली जाते. बरसानाची लठमार होळी, मथुरा बनारसची अबीर-गुलाल होळी, पंजाबातील होला मोहल्ला, कोकण-गोव्याचा शिगमो, उत्तर भारतातील ठंडाई आणि भांगमध्ये मदहोश होळी असे विविध प्रकार रुढ आहेत.  

पुराणकाळी भक्त प्रल्हादाच्या विनाशासाठी त्याच्याच अविचारी पित्याने, हिरण्यकशपूने त्याच्या बहिणीला, होलिकेला दिव्य अग्निरोधक शाल पांघरुन प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. पण ऐन वेळी शाल वार्‍याने उडाली आणि प्रल्हादावर येऊन पडली. होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हादाचे ब्रम्हदेवाने रक्षण केले. नंतर ब्रम्हदेवानेच हिरण्यकशपूचा नृसिंह अवतार धारण करुन वध केला. या अहंकाराच्या आणि द्वेषाच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळी (होली, होलिकोत्सव) साजरी केली जाते.

फाल्गुनी पौर्णिमेला प्रतीकात्मक दहन करुन सर्व दुर्गुणांचा विनाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. इतर वेळी समाजाला घाबरून अथवा लाजेखातर आपला राग आपण शिव्या देऊन सगळ्यांसमोर उघडपणे व्यक्त करू शकत नाही. पण होळीच्या वेळी मात्र याच रागाचे दहन करण्यासाठी एकमेकांना शिव्या देण्याची, बोंब ठोकण्याची पूर्णपणे मुभा असते. हेतू एवढाच कि रुसवे फुगवे सोडून मन स्वछ व्हावे आणि दुसऱ्या  दिवशीपासून स्नेहाचे प्रेमाचे नवीन पर्व सुरु व्हावे. पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी, घरात भरभरून आलेल्या धान्यातूनच होळीला नैवेद्य दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जातात.      

rangpanchamiहोळीच्या दुसर्‍या दिवशी रंगांचा उत्सव म्हणजे धूलिवंदन. तरुणाईचा आणि आबालवृद्धांचा जल्लोष.  वसंताच्या आगमनाचा आनंद अबीर-गुलालातून व्यक्त करण्याचा दिन. आपसांतील मतभेद  विसरुन, सर्व हेवेदावे आणि सामाजिक/आर्थिक स्थिती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करणे हाच या धुळवडीचा उद्देश.काळ बदलला तशी रंगपंचमी साजरी करण्याची पध्दतही बदलली. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाईड, पर्शियन निड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रसायनांमुळेच हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. मात्र या रंगांचे काही परिणाम तात्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने जाणवतात. आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेला रंग (हळद, कडुनिंब,  कुमकुम, गुलाब, पळस) वातावरणातील सर्व विषारी द्रव्याचा निचरा करतात म्हणून नैसर्गिक रंगांनीच होळी खेळावी असे शास्त्र सांगते. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा. मात्र आरोग्याचीही काळजी घ्या. 

तर आपण तयार आहात ना? होली है….!!!

 

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email :  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
ढिल दे दे ढिल दे दे रे भैय्या ....
सण वार

ढिल दे दे  ढिल दे दे रे भैय्या ....

sankrant kite for mumbaipuneonline.comपौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होते. सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायानातून उत्तरायणात होण्याच्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.

यावर्षी म्हणजे २०१४ मध्ये  मकरसंक्रांत १४ जानेवारीला  आली  आहे. 

मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली. या देवीला अनेक हात आहेत. एखाद्या वाहनावर बसून वस्त्रालंकारानी सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे  घेऊन  ती एका दिशेकडून दुसरया दिशेकडे जात असते असे वर्णन पंचांगात दिलेले आहे.संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते.विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात यावरून आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे हा वाक्प्रचारही  आलेला आहे.

संक्रातीचे तीन दिवस

भोगी:
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांती:
यावर्षी म्हणजे २०१३ मध्ये  मकरसंक्रांत १४ जानेवारीला  आली  आहे. 
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।

(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी.

मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरावणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिवमान जाणून लागते. पूवीर् इलेक्ट्रिसाठी नव्हती. त्या वेळी माणसे सूयोर्दयापासून सुर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. फरगीव्ह अँड फरगेट हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे.

बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपणीर् नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिन्नेवल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात.

हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात.

दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे.

किंक्रांत:
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.

संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो.

संक्रांतीच्या दिवशी मनातील द्वेषभाव नाहीसा करून परस्परांत प्रेम निर्माण करायचे असते.  तिळातील स्नेह व गुळातील गोडी आपल्याही जीवनात यावी म्हणून आपण तिळगुळ देतो. म्हणूनच तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणत मनातील सारे रुसवे फुगवे विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करावी.

 

साभार संदर्भ : लेख - संक्रातीचे तीन दिवस
                                          -दा. कृ. सोमण

 
रंगतदार रांगोळ्या
सण वार

रंगतदार रांगोळ्या

rangoli92रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण. भूमीला सजवण्यासाठी , देव्हारा , भोजनाची पंगत , अंगण , शुभकार्य स्थळ इ.जागा सुशोभित करण्यासाठी शंखजीऱ्याची  भाजून केलेली पंढरी पूड , तांदुळाची पिठी, खडू इत्यादी साहित्याने काढलेल्या विविध चित्राकृतींना  रांगोळी असे म्हणतात. त्यात रंग भरून ती अधिक आकर्षक बनवली जाते.

रांगोळीत रंग भरताना : काही टिप्स 

प्रथम रंगसंगती ठरवावी मग त्यानुसार रंग भरावेत.
१. एकाच रंगातील अनेक शेड किंवा २.विरुद्ध रंगाच्या जोड्या  उदा. लाल : हिरवा , पिवळा : जांभळा
एक रंग जर फिकट वापरला तर त्याशेजारी गडद रंग वापरावा. दोन भडक रंग जवळ वापरू नयेत.
रांगोळीत अनेक रंग वापरण्या ऐवजी २-३ रंग वापरावेत आणि त्या रंगांच्या फिकट व गडद छटा वापराव्यात.
रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळी चाळून घ्यावी .जाडी भरडी रांगोळी वापरू नये.
रांगोळीची रेष ही  अत्यंत काटेकोर व नाजूक यायला हवी तरच ती रांगोळी रेखीव दिसते.

रंग कसे तयार करावेत :

पिवळा +हिरवा = पोपटी
हिरवा +काळा = काळसर हिरवा
लाल +पिवळा = केशरी
नारिंगी +रांगोळी = बदामी
तांबडा +पिवळा +काळा = तपकिरी
तांबडा +निळा = जांभळा

रांगोळ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ठिपक्यांच्या रांगोळ्या आणि संस्कार भारती रांगोळ्या यांचा जास्त वापर होतो.
खाली काही सोप्या रांगोळ्या तुमच्यासाठी दिल्या आहेत.

तुमच्या घराच्या छान छान रांगोळ्यांचे फोटो काढून आम्हाला मेल करा . चांगल्या फोटोंना साईट
वर नावासकट प्रसिद्धी देण्यात येईल.
email: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रांगोळ्या:

 rangoli-3  rangoli 4
 rangoli 6  rangoli3

 तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
'दिन' 'दिन' दिवाळी ..... november 2012
सण वार

'दिन' 'दिन' दिवाळी .....

सोनपावलांनी येणार्‍या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. पहिल्या दिवसापासूनच वातावरणात उत्साह आणि जल्लोष भरलेला असतो. मुळात दिवाळी हा सणच सर्वांना आनंदी आणि उत्साही राहता यावे यासाठी साजरा केला जातो. या सणाला धार्मिक महत्त्वाएवढेच शास्त्रीय महत्त्वही आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी.

धनत्रयोदशी :
dhanatrayodashiअश्विन वद्य १३ पासून कार्तिक शुद्ध २ पर्यंत दिवाळी हा सण पाळतात. दिवाळी म्हणजे दिव्यांची ओळ असा अर्थ आहे. या सणात पुष्कळ दिवे लावून आरास करण्याची चाल सर्वत्र आहे.दिवाळीच्या पहिल्या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असे म्हणतात. या दिवशी सर्व लोक आपल्या घरासमोर दिवे लावतात. मुले फटके उडवण्यात गर्क झालेली असतात. स्त्रिया दुसरया दिवशीचे फराळाचे समान करण्यात गर्क झालेल्या असतात.व्यापारी लोक आपली दुकाने साफ करून आरास करण्यात तत्पर झालेले असतात एकंदरीत सर्व जनसमुदाय कोणत्या न कोणत्या कामात गर्क झालेला असतो व जिकडे तिकडे आनंदी आनंद दिसतो . धनत्रयोदशी संबंधाने एक कथा आहे ती अशी :-
एकदा यमराजाने आपल्या दूतास प्रश्न केला की ,"लोकांचे प्राण हरण करण्याचे काम करीत असता तुम्हास कोणाची दया आली होती काय?" त्यावर दूतांनी उत्तर दिले ,"एकदा इंद्रप्रस्थ शहराचा राजा हंस हा मृगयेकरता रानात फिरत असता भूक, तहान व श्रम यांनी व्याकूळ झाला . अशी स्थिती आल्यावर शोध करीत तो हैम नावाच्या राजाकडे गेला. हैम राजाने त्याचे उत्तम स्वागत केले. हैम राजा त्यावेळेस पुत्रसंत्तती प्राप्त झाल्यामुळे आनंदात होता त्या दिवशी त्याच्या घरी षष्ठी पूजन असल्यामुळे षष्टी देवी स्त्री रूपाने प्रगट झाली व राजास म्हणाली की " या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी हा सर्प दंश होऊन मरण पावेल !" हे शब्द ऐकून राजास फार वाईट वाटले व आलेल्या हंस राजासही परम दु:ख झाले. त्याने त्या मुलाचा अपमृत्यू टाळण्याकरिता पुष्कळ प्रयत्न केले. शेवटी एका सरोवरात मधोमध एक खांब पुरून , त्यावर एक बंगला बांधून त्यात त्या मुलाला ठेवले ;परंतु देवीने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्याला सर्पदंश होऊन तो मरण पावला. हे यमराज या वेळेस त्या मुलाचे प्राण हरण करते वेळी आम्हास दया आली. असा प्रसंग कोणावरही येऊ नये , असे जर आपण कराल तर लोकांवर फारच उपकार होतील." हे दुतांचे भाषण श्रवण करून यमराजाने सांगितले की " अश्विन वद्य १३ पासून पाच दिवस जो दिवे लावील त्यास केंव्हाही अपमृत्यू येणार नाही. त्यामुळेच धनत्रयोदशीपासून घरोघरी दिवे, पणत्या लावायला सुरूवात होते.

नरक चतुर्दशी : (दुसरा दिवस) अश्विन वद्य चतुर्दशीस नरक चतुर्दशी म्हणतात. त्या संबंधाने कथा आहेत त्या अशा :

उपपत्ती :
naraka chaturdashi१. नरकासुर या नावाचा दैत्य फार बलिष्ठ झाला होता. त्याने सर्व मानव,राजांस जिंकले होते ;इतकेच नव्हे तर इंद्राची छत्रचामरेसुद्धा त्याने हिरावून घेतली होती. त्यामुळे तो सर्वांस अजिंक्य झाला होता. हे वर्तमान श्रीकृष्णाला समजताच त्याने आपली स्त्री सत्यभामा हिला बरोबर घेऊन, तिच्या हातांनी त्याचा अश्विन वद्य चतुर्दशीस तीन प्रहर रात्रीस चंद्रोदयी वध करविला. नंतर श्रीकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटेस आपल्या स्त्री सह परत नगरास आला. त्या वेळेस सर्व लोकांनी त्याला स्नान घालून , स्त्रियांनी दिवे ओवाळले व जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. त्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येतो.
२.श्रीविष्णूने वामनावतार घेऊन बळी राजास पाताळी दडपिले तो हाच दिवस होय. बळीराजाची निष्ठा व उदारपणा पाहून श्रीविष्णू प्रसन्न झाले व "वर माग!" असे म्हणाले. त्यावेळेस बळी राजाने " तीन अहोरात्र माझे राज्य असो " असा वर मागितला. शिवाय या दिवसात जे लोक आपल्या घरी दिवे लावतील त्यांच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करो व नरकाचे ठिकाणी जे लोक दिवे लावतील त्यांच्या पितरांचा नरकापासून उद्धार होवो!" असेही वरदान मागून घेतले. तेंव्हा पासून हि चाल पडली असावी.

धार्मिक विधी व रूढी : पाहटेस (शेवटच्या प्रहरी ) लवकर उठून जिकडे तिकडे दिवे लावावे. दिवे लावल्यानंतर घरातील सर्व लहान थोर मंडळीनी उटणे व सुगंधयुक्त तेल अंगास लावून (लावावून)गरम पाण्याने स्नाने करावी. स्नान अतापतच डाव्या पायाने नरकासूर म्हणून कारंटे फोडावे. तसेच लहान मुलांनी स्नान करून झाल्यावर फाटाके वाजवावे. तदनंतर स्त्रियांकडून दिवे ओवाळून घ्यावे. निरनिराळी अत्तरे घेऊन देवपूजा करावी.पूजा झाल्यावर कपाळास केशरी गंध लावावे. नंतर चांगला पोशाख व दागदागिने घालून देवदर्शनास जावे. दुपारी मिष्ठान्न भोजन करावे. भोजन झाल्यावर निरनिराळे खेळ खेळून करमणूक करून घ्यावी. अशा रीतीने सर्व दिवस आनंदात घालवावा.रात्री दिवे लावून आरास करावी.

लक्ष्मीपूजन :(तिसरा दिवस)
goddess-mahalaxmi pujan अश्विन वाड्या अमावस्येस लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. घरातील अलक्ष्मीचे म्हणजे दारिद्रयाचे उच्चाटन करून लक्ष्मीचे आवाहन करून शास्त्रोक्त पूजा करणे म्हणजे लक्ष्मीपूजन. प्रत्यक्षात दिवाळी हा हिंदू धर्माचा सण. पण, सर्वधर्मीय लोक लक्ष्मीपूजन साजरा करतात.

बलिप्रतिपदा (चौथा दिवस) कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे असे मानतात. या दिवसाला बलिप्रतिपदा असे म्हणतात.

विधी व रूढी : बालीप्रतीपदेच्या दिवशी बळीचे त्याच्या स्त्री सह चित्र काढून पूजा करावी व जिकडे तिकडे दिवे लावावे. देशावर या दिवशी शेणाच्या बाहुल्या करून त्यांची पूजा करण्याची चाल आहे. ह्या दिवशी विक्रम संवत सुरु होत असल्यामुळे व्यापारी लोक नवीन वर्षारंभ समजतात व आपल्या हिशोबाचा आढावा काढतात. तसेच नवीन कीर्द व खतावणी सुरु करतात. यमद्वितीया - भाऊबीज (पाचवा दिवस) कार्तिक शु. द्वितीयेला यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणतात. यमराजाने आपली बहिण यमुना हिच्या घरी जाऊन तिला वस्त्रे दागिने वगैरे देऊन भोजन केले , म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी बहिणीकडून भावाची पूजा होते व भाऊ आपल्या शक्तीप्रमाणे तिला देणगी देतो म्हणून या दिवसाला भाऊबीज असेही म्हणतात.

हिंदू लोकांत पुष्कळ सण आहेत पण दिवाळी इतका आनंद देणारा दुसरा सण नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही.

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.
संपर्क  :Email :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
गणपती विशेषांक september 2012
सण वार

गणपती विशेषांक

श्रावण महिना संपत आला की वेध लागतात ते आपल्या प्रिय गणरायाच्या आगमनाचे. बाप्पा नुसता आठवला तरी मन कस प्रसन्न होत. आपल्यातल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते. पण गणपती बाप्पावर मात्र खास प्रेम असत. कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात असो, मंगल कार्याचा शुभारंभ असो की अडचणीच्या वेळी येणारी आठवण असो, बाप्पाचा धावा नेहमीच केला जातो.
गणपती हा दश दिशांचा स्वामी आहे. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ती वाढवून वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण करतो. वाम मार्गाने (वाईट मार्गाने ) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून सरळ मार्गावर आणण्याचे काम गणपती बाप्पा करतो म्हणून तो 'वक्रतुंड'.   
गणपती हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मयुरेश्वर - मोरगाव , सिद्धिविनायक - सिद्धटेक , चिंतामणी - थेऊर , महागणपती - रांजणगाव, विघ्नेश्वर - ओझर , गिरिजात्मक - लेण्याद्री, बल्लाळेश्वर - पाली , वरद विनायक - महड  या महाराष्ट्रातील आठ देवळांच्या समूहाला 'अष्टविनायक' म्हणतात. 'अष्टविनायक'  ही महाराष्ट्रातील मनाची देवस्थाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रसिध्द आहेत.
गणेशोत्सवातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे श्रींची प्राणप्रतिष्ठापना. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून दुपारी सूर्य मस्तकावर येईपर्यंत श्री. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी. श्रींची यथासांग पूजा , नैवेद्य व आरती करावी. 
गणेश चतुर्थीच्या काळात 'ॐ गं गणपतये नम:'| किंवा 'श्री गणेशाय नम:|'  हा नामजप जास्तीत जास्त केल्यास गणेशतत्वाचा  खूप जास्त लाभ होतो.
महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये गणपती सोबत गौरी बसवल्या जातात. देशावर , घाटावर उभ्या गौरींची तर कोकणात खड्यांच्या गौरींची परंपरा आहे.
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राला सार्वजनिक गणपतींची ओळख करून दिली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांकृतिक व वैचारिक देवाण घेवाण वाढीला लागली. समाज परिपक्व होऊ लागला. महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या या गणेशोत्सवाने खऱ्या अर्थाने घडविल्या. आजही काही मंडळे अशी आहेत जी गणेशोत्सवाच्या काळात रक्तदान शिबिरे, व्याख्यान माला, करियर मार्गदर्शन यांसारखे उपक्रम हाती घेतात.
इको फ्रेंडली गणेशोत्सवाची सुरुवात अनेक घराघरांमधून या तरुणांनी केली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचण्या - बाजावाण्यापेक्षा निरक्षरांना साक्षर करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी एकत्र येणाऱ्या या मुलांनी खऱ्या अर्थाने गणरायाची , विद्येच्या देवतेची मनोभावे पूजा केली आहे.
सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्व जपून जर अशा आधुनिक सामाजिक जाणीवेचा गणेशोत्सव आपण साजरा करू शकलो तर तेच खरे लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाचे फलित असेल.

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :
Email :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(www.mumbaipuneonline.com या इ मासिकातील (अंकातील ) लेखकांच्या मतांशी संपादक सहमत असेलच असे नाही.)

 
गणपतीची यथासांग पूजा
सण वार

गणपतीची यथासांग पूजा

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून दुपारी सूर्य माथ्यावर येईपर्यंत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल याची काळजी घ्यावी.
१. प्रतिष्ठापनेसाठी स्नान करून पीतांबर, धोतर किंवा नेहमीचे स्वच्छ कपडे घालावेत.
२. शाल, उपरणे, किंवा टॉवेल यांसारखे उपवस्त्र खांद्यावर घ्यावे.
३. चौरंगावर रुमालाची किंवा कापडाची घडी ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी.
४. पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून पाटावर किंवा आसनावर बसावे.
५ प्रथम स्वत:च्या मस्तकावर गंध, कुंकू , शेंदूर किंवा अष्टगंध यापैकी एकाचा टिळा लावावा.
६. विड्याची २ पाने, सुपारी , ५ किंवा १ रुपयाचे नाणे असा विडा व नारळ ठेऊन घरच्या देवांना नमस्कार करावा.
७. घरातील वडिलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा.
८ पळी- भांड्यातील स्वच्छ पाण्याने आचमन करावे.(आचमन म्हणजे ३ वेळा हातावर पाणी पळीने घेऊन प्यावे व चौथ्या वेळेला हातावर पाणी सोडून उष्टा झालेला हात स्वच्छ करावा.)
९ चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या - सुपारीच्या गणपतीवर प्राणायाम , गायत्री जपासह अक्षता व फुले वाहावीत.
१० त्यानंतर ,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
अशी प्रार्थना करावी 'मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे असा संकल्प करावा.
११  शुभंकरोती कल्याणं, आरोग्यं धनसंपदा |
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते II

या मंत्राने समईच्या पायावर फळे ,गंध, अक्षता वाहून  'शत्रुबुद्धीचा नाश व्हावा' अशी प्रार्थना करावी.
१२ घंटेला गंध , फुले, अक्षता वाहून घंटा जोरात वाजवीत पुढील प्रार्थना म्हणावी. 
आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम |
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणं ||
१३ प्राण प्रतिष्ठेसाठी ज्यांना मंत्र पाठ करणे शक्य नसेल किंवा माहिती नसेल त्यांनी किमान ' ॐ गं गणपतये नम: | हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे.
१४ मूर्तीच्या छातीच्या मध्य भागी उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करावी. 
१५. निदान १५ वेळा ॐ कारचा जप करावा.
१६ त्यानंतर 'देवस्थ प्राण: |इह स्थित: | अशी प्रार्थना करावी. 
१७ गजाननाच्या मूर्तीवर पुन्हा गंध , अक्षता , फुले वाहून गुळ - खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि विडा , नारळ यांवर पाणी सोडावे असे केल्याने प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वात महत्वाचा विधी पूर्ण होईल.  

पंचामृतस्नान-
दुध , दही, गायीचे शुद्ध तूप , मध , साखर हे पंचामृत दुर्वांनी हळूवार शिंपडून मूर्तीला स्नान घालावे.पंचामृत स्नानाची सांगता सहाव्या  गंधोदकाने (गंधाचे सुवासिक पाणी) करावी. नवीन वस्त्र आणि जानवे घालून झाल्यानंतर मूर्तीला फुलांनी सुवासिक अत्तर लावावे. गुलाब पाणी शिंपडावे. सुवासिक चाफा , गुलाब, सोनटक्का, जाई, जुई , केवडा यांसारखी फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दुर्वांची जुडी अष्टगंध , शेंदूर यांत बुडवून ही फुले ,दुर्वा मूर्तीला वाहाव्यात. फुले ,दुर्वा यांच्या माध्यमातूनच हळद कुंकू इत्यादी परिमल द्रव्ये अर्पण करावीत.    


नैवेद्य व आरती :
१. चौरंग - टेबल ज्या खोलीत मांडलेले असेल त्या खोलीत भरपूर निखाऱ्यावर धूप , गुळ , गुग्गुळ ही सुगंधी द्रव्ये टाकून वातावरण सुवासिक करावे.
२. उदबत्ती , निरांजने ओवाळून झाल्यावर 'श्रीं' साठी खव्याचे मोदक ,पेढे , लाडू यापैकी एकाचा किंवा जे गोड अन्नपदार्थ तयार केलेले असतील त्यांचा किंवा भोजन तयार असेल तर भोजनथाळीसह नैवेद्य दाखवावा.  वरण -भात , भाजी ,पोळी , मोदक , चटणी , कोशिंबीर , असे सर्व प्रकारचे पदार्थ गणेशाच्या नैवेद्यात असतात. गणपतीच्या नैवेद्यासाठी २१ उकडीचे मोदक प्रामुख्याने लागतात.
३. मनोमन प्रार्थना करावी. 
४. गंध, अत्तर लावलेले फुल गणपतीच्या पायावर अर्पण करून चौरंगावर मांडून ठेवलेल्या दक्षिणेसह विडा, फळे , नारळ यांवर पळीने पाणी सोडून श्री गजाननाला अर्पण करावे आणि २ तूपवातींच्या निरांजनानी ( तबक ताम्हणात ठेऊन ) मंगल आरती करावी. 
५ 'सुखकर्ता , दुख:हर्ता....' ही गणपतीची आणि दुर्गे दुर्गटभारी  ही देवीची आरती म्हणावी. कापूरारतीने आरतीचा शेवट व्हावा.
६. मंत्र पुष्पांजली ( यज्ञेन .......) म्हणावे आणि फुले , अक्षता वाहून प्रदक्षिणा घालून घालीन लोटांगण ......ही प्रार्थना म्हणावी.    
इतर अनेक प्रार्थना म्हटल्या गेल्या तरी पुढील प्रार्थना म्हटल्या जातील असे पाहावे.
रूपं देही जयं देही | (बाप्पा माला रूप व जय दे)
यशो देही द्विषो देही |  ( यश दे , द्वेष करणाऱ्यांना पिटाळून लाव)
पुत्रान देही धनं देही | (मुलांची प्राप्ती होऊ दे , त्यांना भरपूर धन दे) 
सर्वान कामांश्च देही मे |
अन्यथा शरणं नास्ति | त्वमेव शरणं मम ||  (तुझ्याविना अन्य आश्रय नाही)
तस्मात  कारुण्य  भावेन | रक्ष रक्ष परमेश्वर || (दयाळूपणे माझे रक्षण कर )
सर्वेत्र सुखिन: सन्तु | सर्वे सन्तु निरामय:|
सर्वे भद्राणि पश्चन्तु | मा कश्चिददुख: माप्नुयात ||
(सर्वजण सुखी  व्हावेत , सर्व निरोगी असावेत , कल्याणकारक जीवन पहायला मिळावे , कोणाच्याही वाट्याला दुख: येऊ नये.)

- रश्मी उदय मावळंकर
 

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla