Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
"बंद'च्या अफवेने पेट्रोलपंपांवर रांगा
विशेष बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:20

"बंद'च्या अफवेने पेट्रोलपंपांवर रांगा

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात राज्यातील पेट्रोलपंपचालकांनी "बंद‘ पुकारला असला तरी, पुण्यातील पेट्रोलपंप सुरूच राहणार आहेत. "बंद‘च्या अफवेमुळे पुणेकरांनी इंधन भरण्यासाठी धावाधाव करीत पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली.

पेट्रोलपंपचालकांच्या राज्य संघटनेने मूल्यवर्धित कर (व्हॅट) तीन टक्‍क्‍यांनी कमी करावा, एलबीटी 0.1 टक्के इतकाच आकारावा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी संघटनेने "बेमुदत बंद‘ आंदोलन जाहीर केले. या आंदोलनात पुण्यातील पेट्रोलपंपचालक सहभागी होणार असल्याचे चुकीचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले. सोशल मीडियावरूनही या आंदोलनाची चुकीची माहिती पसरविली गेली. यामुळे पुण्यातील सर्वच पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा संप बेमुदत असल्याने, वाहनचालकांनी जास्तीत जास्त इंधन भरून घेतले. काही पंपांवर सर्वांनाच इंधन मिळावे यासाठी मर्यादितच पेट्रोल, डिझेल वाहनचालकांना दिले गेले. वाहनांच्या रांगा लागल्याने कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता आदी भागांत वाहतूककोंडी निर्माण झाली.

गर्दीमुळे इंधनच संपले
काही पंपांतील इंधन दुपारपर्यंत संपले, तर काही पंपांवर पेट्रोल उपलब्ध नव्हते आणि डिझेलची विक्री सुरू होती. वाहतूककोंडीची तक्रार आणि पेट्रोलपंप सुरू राहणार की नाही, याची चौकशी "सकाळ‘ कार्यालयात संपर्क साधून नागरिक करीत होते.

पुण्यातील पंप सुरूच राहणार
राज्य संघटनेने पुकारलेल्या "बंद‘मध्ये पुण्यातील पेट्रोलपंपचालक सहभागी होणार नाहीत. तरीही नागरिकांनी भीतीपोटी इंधन भरण्यासाठी गर्दी केल्याचे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील 490 पेट्रोलपंप सुरूच राहणार आहेत. पुण्यातील पंपचालकांना एलबीटी भरावा लागत नाही. संबंधित इंधनकंपनीच हा कर भरते. त्यामुळे हा प्रश्‍न पुण्यात नाही. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आम्ही प्रत्येक पेट्रोलपंपावर संपात सहभागी नसल्याचे फलक लावण्यास सांगितले आहे.
बाबा धुमाळ, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन

साभार -सकाळ वृत्तसेवा

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla