Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम होणार मराठीतून
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:12

तंत्रशिक्षण अभ्यासक्रम होणार मराठीतून

Jun 30, 2014

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच इंग्रजीची भीती असलेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अवघड जाऊ नयेत, यासाठी लवकरच तंत्रशिक्षण अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सुरुवातीला 'कमवा व शिका' योजनेतील इंजिनीअरिंग डिप्लोमाचे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्याटप्प्याने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमही मराठीतून उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती दिली.

 

यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतर्फे 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचा सत्कार समारंभ टोपे यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे दिलीप चिनॉय, तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन, वायसीएमओयूचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महापौर चंचला कोद्रे, आमदार विलास लांडे, टाटा मोटर्सचे गजेंद्र चंडेल, संस्थेचे विश्वेश कुलकर्णी, प्रदीप तुपे आदी या वेळी उपस्थित होते.

'भाषा हे संवादाचे मुख्य माध्यम आहे. अभ्यासक्रम मातृभाषेत असल्यास ते अधिक चांगल्या रितीने समजू शकतील. या पार्श्वभूमीवर टर्मिनोलॉजी (संज्ञा) इंग्रजीतच ठेवून त्याचे स्पष्टीकरण मराठीत अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. प्रथमतः 'कमवा व शिका' योजनेचे डिप्लोमा अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्यात येतील,' असे टोपे यांनी स्पष्ट केले.

'कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी उद्योग जगताने पुढे यावे. अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना कामाची संधी देणे, चांगला स्टायपेंड देणे यासाठी उद्योगजगताने पुढाकार घ्यावा,' असे टोपे यांनी स्पष्ट केले. जालन्यातील अंबड येथे डायलेसिस टेक्निशियन प्रशिक्षण केंद्र तर कोल्हापूर येथे फाउंड्री प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

आणखी तीन खासगी विद्यापीठे लवकरच

खासगी विद्यापीठ कायद्यानुसार राज्यात लवकरच आणखी तीन खासगी विद्यापीठे अस्तित्वात येणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच दोन खासगी विद्यापीठांना विधीमंडळाने मान्यता दिली होती. त्या पार्श्वभूमीवर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अध्यादेश काढून या तीन विद्यापीठांना मान्यता दिली जाणार आहे, यामध्ये पुण्यातील 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' (एमआयटी) चा समावेश आहे.

ललित कला विद्यापीठाचा प्रस्ताव तयार

राज्यात ललित कला विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, याविषयीचा संपूर्ण प्रस्ताव तयार आहे. त्यातील सर्व कायदेशीर बाबीही तयार असून केवळ मुख्यमंत्र्यांची मान्यता बाकी आहे. तसेच, जुना विद्यापीठ कायदा बदलून नवा सुधारित विद्यापीठ कायदाही तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास अध्यादेशाद्वारे ललित कला विद्यापीठ तसेच नवा विद्यापीठ कायदाही लागू करण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

साभार : महाराष्ट्र टाईम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla