Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पाणीपुरवठ्याचे डोंगराएवढे आव्हान
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:11

पाणीपुरवठ्याचे डोंगराएवढे आव्हान

महानगरपालिकेच्या संपूर्ण कामकाजावरच ताण येण्याची भीती
Jun 30, 2014

महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे या नवीन गावातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. पालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांना पुरेसा आणि नियमीत पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे.

पालिका हद्दीत ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने पुणे शहराला १९ 'टीएमसी' पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यापूर्वीच पालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.
पालिका हद्दीत नवीन ३४ गावांच्या समावेशामुळे सध्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह जलशुद्धीकरण प्रकल्प, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र यावर मोठा ताण येणार आहे. त्यातच पालिका हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नवीन कायद्यानुसार महापालिकेवर टाकण्यात आली आहे. परिणामी नवीन समाविष्ट गावांसह हद्दीबाहेरील पाच किलोमीटरच्या सर्व गावांना पाणी देण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. नियमीत आणि पुरेसे पाणी हा पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी देण्यावरून अनेकदा यापूर्वी शहरी ग्रामिण असा जोरदार वादही निर्माण झालेला आहे. आजही महापालिका हद्दीत असलेल्या प्रत्येक भागाला समान पाणीपुरवठा केला जात नाही.

वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षात चारही दिशांना शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मात्र या तुलनेत आवश्यक असलेला पिण्याच्या पाण्याचा कोटा मात्र वाढलेला नाही. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १५ टीएमसी पाणी राज्याच्या जलसंपदा विभागाने महापालिकेला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गेली पाच ते सहा वर्षापासून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पालिकेबरोबर जलसंपदा विभागाने केवळ साडेअकरा टीएमसी पाण्याचा करार केला आहे. पालिका हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरावर पाणी देण्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेवर असल्याने यापूर्वी हद्दीबाहेर येत असलेल्या हडपसर, किर‌कटवाडी, आंबेगाव, नऱ्हे, वाघोली, बावधन या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेवर होती. या भागात अनेक उंच उंच इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे येथील नागरिकांना पालिकेलाच पाणी द्यावे लागते.

मैला कुठे सोडायचा?

पाणी पुरवठ्या सारखीच गत ड्रेनेज व्यवस्थेची आहे. नवीन गावांमध्ये आवश्यक असलेली ड्रेनेज व्यवस्था निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला खर्च करावा लागणार आहे. तसेच या गावातून तयार होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या शहरात निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावरच संपूर्ण प्रक्रिया करण्यात महापालिका अपयशी ठरली असताना, आता आणखी ३४ गावांचा मैला कुठे सोडायचा? हा प्रश्न निर्माण होत आहे.

सरकारकडे १९ टीएमसी पाण्याची मागणी

पालिका हद्दीत नवीन गावांचा समावेश करताना या नवीन गावासह शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने १९ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालिकेने ठरावाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. नवीन ३४ गावांच्या समावेशामुळे शहराच्या लोकसंख्येत अधिकच भर पडणार असून नवीन हद्दीपासून पाच किलोमीटर पुढे पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर राहणार आहे.

साभार : महाराष्ट्र टाईम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla