Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
हातमाग उत्पादनांचे ‘फ्लिपकार्ट’वर मार्केटिंग
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:00

हातमाग उत्पादनांचे ‘फ्लिपकार्ट’वर मार्केटिंग

हातमागावर कापडाचे उत्पादन घेणाऱ्या विणकरांच्या उत्पादित मालाचे विपणन (मार्केटिंग) करण्यासाठी मोदी सरकारने ऑनलाइन रिटेल क्षेत्रातील आघाडीच्या 'फ्लिपकार्ट'ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि 'फ्लिपकार्ट'मध्ये सोमवारी सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या करारान्वये विणकरांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांची 'फ्लिपकार्ट'च्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. या शिवाय विणकरांना पायाभूत सोयीसुविधा विषयक आवश्यक ती सर्व प्रकारची मदत आणि गळेकापू स्पर्धेमध्ये आपल्या उत्पादनाला चांगला उठाव मिळण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिवाय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, राज्य पुरस्कार विजेते, होतकरू आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विणकरांना 'फ्लिपकार्ट'तर्फे वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढावा यासाठी टीप्स देण्यात येणार आहेत. 'अशाप्रकारे प्रथमच फ्लिपकार्टशी करार करण्यात येत असून, विणकरांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म देण्याचा सरकारचा उद्देश आहे. या माध्यमातून त्यांच्या नव्याने ओळखी होतील आणि त्यांना स्वउत्पादित मालाचे मार्केटिंग करणे सहज शक्य होईल,' अशी अपेक्षा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

या उपक्रमाविषयी बोलताना केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोषकुमार गंगवार म्हणाले की, 'हातमागावर कापडाचे उत्पादन घेणारे विणकर बांधव केवळ उत्पादकच न राहता त्यांच्यातील व्यावसायिकाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने फ्लिपकार्टसमवेत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. एका ठिकाणी उत्पादन घेऊन ते देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.'

साभार -वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla