Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकपदी दोन स्वतंत्र व्यक्तींच्या नेमणुकांचा विचार
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 03:55

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकपदी दोन स्वतंत्र व्यक्तींच्या नेमणुकांचा विचार

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील व्यवहाराच्या निर्णयाचे सर्वाधिकार एकाच व्यक्तीकडे ठेवू पाहणारी व्यवस्था केंद्र सरकार बदलण्याच्या प्रयत्नात आहे. यानुसार या बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद वेगळे करून त्यावर दोन भिन्न व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या विचारात सरकार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख या नात्याने एकाच व्यक्तीकडे असलेले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय वित्त सेवा सचिव जी. एस. संधू यांनी सोमवारी वृत्तसंस्थेला दिली.
५० लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात सिंडिकेट बँकेच्या अध्यक्षांचे नाव आल्यानंतर तसेच देना बँक व ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये ४३६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुख पदावरील व्यकींच्या फेरआढाव्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिपादन केली होती.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद एकाच व्यक्तीकडे न ठेवता अशा दोन पदांवर दोन भिन्न व्यक्तींची नेमणूक करावी, अशी शिफारस यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थ खात्याला केली होती. अशा व्यक्तीकडे दोन पदांमुळे जादा अधिकार येतात, असा त्यासाठी दावा करण्यात आला होता. २००४-०५ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने ए. एस. गांगुली यांच्या अध्यक्षपदी समिती नेमून या दोन्ही पदांच्या भिन्नतेचा विचार प्रथम मांडला होता. त्याची अंमलबजावणी सार्वजनिक क्षेत्रातील बँक क्षेत्रात झाली नसली तरी खासगी बँक क्षेत्रात ती २००७ पासून होऊ लागली.
देशातील जवळपास सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आहेत. याला केवळ देशातील सर्वात मोठी स्टेट बँक हीच अपवाद आहे. बँकेच्या अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य आहेत, तर चार विविध व्यवस्थापकीय संचालकपदावरील व्यक्ती आहेत. खासगी बँकांमध्ये मात्र अध्यक्ष हे बिगर कार्यकारी पद असते, तर व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्तीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी हेही पद असते.

साभार- लोकसत्ता

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla