Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
दुसरीची पुस्तके उशिराने
शैक्षणिक बातम्या
Friday, 07 June 2013 04:52

दुसरीची पुस्तके उशिराने

Loksatta |रेश्मा शिवडेकर, मुंबई

नेहमीच्या आकाराच्या तुलनेत मोठी आणि आकर्षक चित्रांनी नटलेली इयत्ता दुसरीची 'कॉम्पॅक्ट' रूपातील पाठय़पुस्तके या वर्षी थोडय़ा उशिराने म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर आठवडाभराने विद्यार्थ्यांच्या हातात पडण्याची शक्यता आहे. तर स्वाध्याय पुस्तिकांचा नवा तजेलदार सुगंध हुंगण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलै महिना उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५'नुसार 'राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे'ने (एनसीईआरटी) तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली-दुसरीचा पाठय़क्रम बदलण्यात आला आहे. 'राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे'ने (एससीईआरटी) या आराखडय़ाला अंतिम स्वरूप दिले असून, त्यामुळे 'केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा'च्या (सीबीएसई) आणि 'बालभारती'च्या अभ्यासक्रमातील तफावत भरून निघण्याचा दावा केला जात आहे. पहिली-दुसरीनंतर आठवीपर्यंतची पाठय़पुस्तके पुढील दोन वर्षे टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत.
नवीन पुस्तके त्यातील मजकुराबरोबरच देखणी असतील, असा दावा बालभारतीतर्फे करण्यात येत असल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या वर्षी पहिल्यांदाच साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'प्रवेशोत्सवा'त शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्याचा विचार आहे, पण दुसरीच्या पाठय़पुस्तकांची छपाईची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. ही पुस्तके छपाईला येण्यासाठी आणखी आठवडाभराचा अवकाश असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी तर सोडाच; पण पुढे आठवडाभर तरी नव्या पुस्तकांचा कोरा करकरीत गंध हुंगण्याची संधी विद्यार्थ्यांच्या मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
पहिली-दुसरीला मराठी, इंग्रजी भाषा आणि गणित अशी तीन पुस्तके आहेत. त्यापैकी पहिलीच्या इंग्रजीच्या २० लाख प्रती छापून तयार आहेत. मराठी व गणिताच्या पुस्तकांच्या छपाईची प्रक्रिया सुरू असून ती देखील शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारात येतील. पण, दुसरीच्या तिन्ही पुस्तकांची बोंब आहे. कारण, या पुस्तकांच्या आराखडय़ालाच अंतिम स्वरूप न मिळाल्याने त्यांची छपाई सुरू झालेली नाही. सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरू झाल्यानंतर आठवडाभर तरी ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडण्याची शक्यता नाही. पाठय़पुस्तकांनंतर स्वाध्याय पुस्तिकेचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे, स्वाध्याय पुस्तिकाही हातात यायला जुलै उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
'महाराष्ट्र राज्य पाठय़ुपस्तक संशोधन व निर्मिती मंडळा'चे (बालभारती) संचालक गंगाधर म्हमाणे यांनी मात्र दुसरीची पुस्तके वेळेत उपलब्ध होतील, असे आश्वासन दिले. 'दुसरीची पाठय़पुस्तके छपाईला जाण्याच्या प्रक्रियेत असून शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे १७ जूनपर्यंत उपलब्ध होतील,' असा दावा त्यांनी
केला.
अभ्यासक्रम असे बदलणार
जून, २०१४ - पहिली, दुसरी
जून, २०१५ - तिसरी, पाचवी, सातवी
जून, २०१६ - चौथी, सहावी, आठवी
पुस्तके झाली 'कॉम्पॅक्ट'
पहिली-दुसरीला तीन विषयांची प्रत्येकी ७२ पानांची अशी सत्र १ आणि २ साठी स्वतंत्र दोन पुस्तके होती. तसेच, प्रत्येक विषयाची ६२ पानांची स्वतंत्र स्वाधाय पुस्तिका. म्हणजे सगळी मिळून नऊ पुस्तके पहिली-दुसरीला असायची. पण, आता प्रत्येक विषयासाठी दोनऐवजी एकच पाठय़पुस्तक असणार आहे. तसेच स्वाध्याय पुस्तिकाही तिन्ही विषयांना मिळून एकच असणार आहे.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla