पुण्याचा इतिहास
अमृततुल्यच्या शेजारी लॅव्हिश कॉफी शॉप आले, वाडे अदृश्य होऊन इमारतींनी क्षितीज रेषा बदलली.'गुडलक' पासून हाकेच्या अंतरावर असूनही मेक्डोनाल्डचा करिष्मा जाणवू लागला.वाडेश्वर मध्ये तरुणाई फुलू लागली अन त्याच प्रमाणे या भागातील जागांचे भाव ही बहरू लागले.मनाने दिलदार असलेले पुणे पूर्वीपासूनच लकाकत होते आता ते चमकू देखील लागले. श्रीमंत पुणेकर हे केवळ लिहिण्याचे वाक्य राहिले नाही तर विविध पातळीवर ते अनुभवातही येऊ लागले ; आणि आम्ही पुणेकर ते we puneites चा प्रवास सुरु झाला. हाच प्रवास इथे टिपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे .
पुणे शहराच्या इतिहासाचे स्थूल मनाने चार कालखंड पडतात. मध्ययुगीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि अव्वल आंग्लकालीन. १९५० साली पुणे म्युनिसिपालीटी चे रुपांतर पुणे महानगरपालिकेत झाले. १९६१ साली पानशेत महापुराची आप्पती पुनर्रचनेच्या दृष्टीने एक प्रकारची इष्टापत्ती ठरली. या दोन घटनांमुळे पुणे शहराच अंतर्बाह्य स्वरूप अमुलाग्र बदललं.
पुणे या नावाचा स्पष्ट उल्लेख शहजिंपुर्वी क्वचित आढळतो. आणि जो आढळतो तो पुणे या नावाने नव्हे तर पुण्याविषयक , पुनकविषयक, पुणक या नावाने आणि तो ही ताम्रपटातून .
शहाजी राजे , शिवाजी महाराज, संभाजी आणि राजाराम यांच्या शंभर वर्षांच्या काळात पुण्यात मराठे आणि देशस्थ ब्राह्मण यांचे संख्याबळ अधिक होते व एकूण लोकजीवनावर त्यांचा प्रभाव होता. पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत (१७०७ ते १७४८) त्यांच्या तीन पेशव्यांनी विशेषत: बाजीरावांनी आणि नानासाहेबांनी पुणे ही राजधानी केल्यामुळे पुण्याचा विस्तार झपाट्याने वाढू लागला आणि कोकणातील चित्तपावन घराणी पुण्याकडे लोटू लागली .
पुण्यातील कसबा गणपती आणि त्यानंतर बांधली गेलेली तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या २ ग्रामदेवता खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहेत. पर्वतीवरील मंदिरे नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत (सुमारे १७५० साली) साकार झाली. आणि त्या पाठोपाठ ओमकारेश्वर , अमृतेश्वर , रामेश्वर, हरिहरेश्वर , सारसबागेतील गणपती, नरसोबा , तुळशीबाग , बेलबाग , खुन्या मुरलीधर , मोदी गणपती ,चतु:शृंगी अशी अनेक मंदिरे उभारली गेली.
शनिवार वाड्याचा जो काही व्याप , डौल नी दिमाख निर्माण झाला तो नानासाहेबांच्या काळात, पार्वतीची निर्मिती ही त्यांनीच केली आणि कात्रजला तलाव बांधून शहरात नळ आणण्याची मूळ योजना ही नानासाहेबांचीच होती.
रावबाजी यांनी विश्राम वाडा (१८०९), बुधवार वाडा (१८१३) आणि शुक्रवारवाडा हे तीन नवे वाडे बांधले. १८२१ मध्ये 'पुणे पाठशाळा' ही पुण्यातील आद्य शिक्षण संस्था 'विश्रामबाग वाड्यात' सुरु झाली. पुणे हे अगदी पेशवाई पासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत डझनभर बागा शहराच्या आसपास होत्या. त्यापैकी काहींची नावं सांगायची तर हिराबाग , सारसबाग , मोतीबाग, माणिक बाग, रमणबाग , कात्रज बाग, रान वडी बाग इत्यादी सांगता येतील.पुण्यात आजही जिजामाता बाग , एक्स्प्रेस गार्डन , बंड गार्डन , संभाजी उद्यान , कामाला नेहरू उद्यान सकाळ संद्याकाळ गजबजलेली असतात. पण सर्वात जुनी ऐतिहासिक बाग म्हणाल तर 'हिराबाग'.
नानासाहेब पेशव्यांनी १९५० च्या सुमारास आपल्या 'हिरा' नामक नायकिणीसाठी ही प्रशस्थ आल्हाददायक बंगला -बाग निर्माण केली. सरस बागेच्या वायव्येस नी टिळक रोड च्या दक्षिणेस असणारी ही हिराबाग रस्त्यावरून सहजा सहजी दिसत नाही. ती पाहण्यासाठी उद्योग भवन आणि हॉटेल अप्साराच्या आतून जाव लागतं. रुंद प्रवेश मार्गावरून आत गेल की समोरच एक वृक्षाच्छादित जुनी वास्तू दिसते. तिथे प्रवेश द्वारी 'टाऊन हॉल कमिटी' व 'डेक्कन क्लब' असा नामफलक आहे. तो वाचून आपण आत गेलो की भव्य ऐसपैस लाकडी महिरपी दिवाणखाना दिसतो. गेली अनेक वर्षे तिथे सेवानिवृत्त सुखवस्तू मंडळी बिलीयर्ड , बॅडमीनटन, ब्रिज इत्यादी खेळ खेळत असतात. हिराबागेतील 'टाऊन हॉल' या ऐतिहासिक वास्तूत सुमारे १३० वर्षांपूर्वी (१७ नोव्हेंबर १८९१ ) काही इंग्रजी व देशी प्रतिष्ठित नागरिकांनी 'डेक्कन क्लब' ची स्थापना केली.
पर्वती:
उत्तर पेशवाईत वृक्षलता , झाडेझुडपे इ. वनश्रीने पर्वती टेकडी नयनरम्य दिसत असे.पण स्वातंत्रोत्तर काळात विशेषत: पानशेत पुरानंतर तिचा खूपच कायापालट झाला. २३ एप्रिल १७४९ रोजी पर्वतीवर देवदेवेश्वर मंदिर उभ राहील. या मुख्य मंदिरा खेरीज उत्तर पेशवाईत कार्तिक स्वामी ,श्रीविष्णू मंदिर , जामदार खाना, मुद्पक खाना , होम शाळा इ वास्तू बांधल्या गेल्या.
सार्वजनिक गणेशउत्सव - पुणे शहरातील कसबा गणपतीच्या पुनरस्थापनेत जीजामातेचा पुढाकार होता. तर चिंचवड देवस्थानाला छत्रपतींचा आश्रय होता. उत्तर पेशवाईत शनिवार वाड्यातील श्री गणेश महालात चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव मोठ्या दिमाखाने साजरा होत असे. गणेश उत्सवाला सार्वजनिक व सार्वत्रिक रूप प्राप्त झाल ते पाऊणशे वर्षांनी. १८९३ मध्ये शालुकरांच्या बोळात भाऊ रंगारी यांच्या घरी पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींची बैठक भरली.आणि भाऊ रंगारी , गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खाजगीवाले यांनी तीन सार्वजनिक गणपती बसवून या उत्सवाचा श्री गणेशा केला. 'केसरी' कार बाळ गंगाधर टिळकांनी लगोलग स्पुट लिहून नव्या उपक्रमाची प्रशंसा केली. पुढल्या १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात टिळकांनी स्वत:चा सार्वजनिक गणपती बसवून आणि इतरांना प्रोत्साहन देऊन उत्सवाला खऱ्या अर्थाने सार्वजनिक रूप प्राप्त करून दिले.
पुण्याची मंडई :
पुण्याची मंडई आता १३० वर्षांची झाली आहे. केसरी ,मराठा पत्रे निघाली त्या काळी (१८९१) पुण्याचा विस्तार १७- १८ पेठांपुरताच मर्यादित होता.लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजी पाला आणि फळ फालावळ यांचा बाजार भरे तो शनिवार वाड्या पुढील पटांगणात. नगरपालिकेच वार्षिक उत्पन्न तर ४-५ लाखांपर्यंतच होत. अशा स्थितीत उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या 'क्रॉफर्ड मार्केटच्या' धर्तीवर पुणे शहरातही बंधिस्त मंडई असावी, असा विचार अनेक नगर सेवकांच्या मनात घोळू लागला. त्या प्रमाणे १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला गेला. मंडई साठी शुक्रवारातील सरदार खासगीवाले यांची बागवजा मोकळी पडलेली जागा निवडण्यात आली. ही चार एकराची जागा ४० हजार रुपयांना खरेदी करून पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक वासुदेव बापुजी कानिटकर यांच्यावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याप्रमाणे अडीच तीन वर्षात जवळ जवळ तीन लाख रुपये खर्च करून अष्टकोनी विस्तृत उंच टॉवर असलेली इमारत उभी केली. त्यावेळचे राज्यपाल 'लॉर्ड रे' यांच्या हस्ते १८८६ रोजी 'रे मार्केटचे' शानदार पणे उद्घाटन झाले. त्याचे पुढे १९३९-४० साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले मंडई ' असे नामकरण केले.
म्युनिसिपालीटी:पुण्यात जून १८५७ पासून म्युनिसिपालटी स्थापन झाल्याची घोषणा झाली आणि वर्षभरात तिचा रीतसर कारभार सुरु झाला. १८५७ ते १८८२ या काळात शहरात अनेक अरुंद रस्ते नी गल्ल्याबोळ होते . रात्री रस्त्यावर रॉकेल व खोबरेल तेलाचे दिवे लावले जात. घरोघरी विहिरी नी आड असत. अनेक वाड्यांतून पाण्याचे हौद असत. काही रस्त्यांवरही असत. उदा. सदाशिव पेठेचा हौद , फडके हौद , काळा हौद इ. १८७९ मध्ये खडकवासला धरणाचे काम पूर्ण झाले तेंव्हा कुठे नळांद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बराचसा सुटला. 'सरदार दोराबजी पदमजी' हे पुणे म्युनिसिपालीटी चे पाहिले दीर्घ काळाचे अध्यक्ष होते. निवडणुकांमुळे नागरी कारभार सुरु झाल्यामुळे आणि मतदारांची व्याप्ती वाढल्यामुळे 'पुणे नगरपालिका' हे मराठी नावं रूढ होत गेले. नवा पूल, लाकडी पुलाचे नुतनीकरण आणि मंडई या तीन गोष्टींमुळे पुणे शहर भराभर विस्तारत गेले. तथापि १९३० पर्यंत लक्ष्मी रोड, टिळक रोड अस्तित्वात नव्हते. जंगली महाराज रोड तर १९३५ नंतरचा आहे. डेक्कन जिमखाना , पी. वाय.सी. , फर्ग्युसन कॉलेज रोड या भागात नव्याने बंगले उठत होते. कर्वे रोड वर आयुर्वेद रसशाळेच्या पश्चिमेस एरंड वन , कोथरूड हे भाग फक्त नावापुरते मर्यादित होते. डेक्कन जिमखान्याचे पोस्ट ऑफिस १९२३ मधले आहे. यावरून लाकडी पुलाच्या पलीकडे नागरवस्ती फारशी नव्हती तुरळक होती हे स्पष्ट आहे.
पुणे शहर वाढत गेले तसे ते आधुनिक ही होत गेले. पण म्हणून इतिहासाचा वारसा विसरलेले नाही. एखादा उत्साही तरुण आजही आपल्या नव्या बंगल्यात व प्रशस्थ फ्लॅटला जुन्या वाड्याचा लुक कसा येईल हे काळात नकळत पाहत असतो. शहराहीतील कोथरूड , एन. आय. बी. एम. हडपसर , निगडी , कात्रज , सिंहगड रोड , भोसरी , औंध , कोंडवा यासह अन्य ठिकाणी ही टोलेजंग इमारती बघता बघता उभारल्या , गजबजल्या आणि कमी देखील पडल्या. मग पुन्हा नव्यासाठी जागा शोधणे आले. अनेक नवीन विकासक तयार झाले. तरुण बिल्डर्स नव्याने बांधकाम व्यवसायात उतरू लागले. मनाने दिलदार असलेले पुणे पूर्वी पासून लकाकत होते आता ते चमकू देखील लागले. 'श्रीमंत पुणेकर' हे केवळ लिहिण्याचे वाक्य राहिले नाही तर विविध पातळीवर ते अनुभवता ही येऊ लागले आहे.
|