Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

मुंबईचा इतिहास


मुंबईच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला तर बॉम्बे सिटी गझेट प्रमाणे ख्रिस्तोत्तर १३०० मध्ये शिलाहार राजवटीतील बिंब नावाचा राजा प्रसिद्ध झाला.त्याने महिकावती (माहीम) शहर वसवले व किल्ला बांधून राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' (नायगाव ) ही होती. लोक सुखी होते. जमीन , महसूल, न्याय वगैरे च्या बाबतीत तो न्यायी व आदर्श होता. त्यानंतर या बेटावर गुजरात च्या मुबारकशहाने प्रथम सन १३२३ साली स्वारी करून साष्टी जिंकली. पुन्हा इ.स. १३४७ मध्ये नागरदेव हा साष्टीवर राज्य करू लागला. नंतर मरोळ जवळील प्रतापपूर व वसई येथे निकामालिक याचे लष्करी तळ होते. याच्याच कारकिर्दीत भोगले सरदार (भंडारी) यांचे बंड झाले. अशी घडामोड सतत चालू होती.

सन १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजशाही कमकुवत झाली आहे हे लक्षात घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला.  तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अति उत्साहाने येथील एत्तदेशीय लोकांना अनेक प्रकारांनी छळले. अनेक देवळे भ्रष्ट केली. वंद्रापासून वसई पर्यंत अनेकांचे ख्रिस्तीकरण झाले होते.  पोर्तुगीजांपासून १८ फेब्रुवारी १६६५ मध्ये इंग्रजांचा सेनापती 'हम्प्रे कुक' याने साष्टी बेटे मिळवली.त्यामुळे मुंबई चे गोवा झाले नाही. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा मुत्सद्दी पणाने राजकारण करण्याकडे विशेष दृष्टीकोन होता.

मुंबई ची वस्ती कशी वाढली ?

मुंबईत आरंभी जी वस्ती झाली तिचे विभाग स्वाभाविकपणे पडलेले दिसतात. परळ व शिव येथे कुणबी राहत. माझगाव , परळ , वरळी हा भाग म्हणजे त्या वेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू व साष्टी मधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती.
१६७० मध्ये सुरते हून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनिया वर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली असे दिसून येते. १६७२ मध्ये शिवाजींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची सत्ता साष्टी येथे होती, त्यामुळे ही वस्ती वाढत गेली.
जीरोल्ड ओन्गीयर  हे मुंबई चे स्वास्थ्यप्रिय गव्हर्नर  होते . मुंबई ची वस्ती वाढावी व स्थिर व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा कल स्वास्थ्य व शांतता प्रिय नागरिक व व्यापारी वर्गाने येथे यावे अगर अशांना स्वास्थ्य  मिळावे या हेतूने न्याय व्यवस्था त्याने उत्तम केली. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संरक्षण खाते वाढवले.

इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबई ची लोकसंख्या केवळ दहा हजारांपर्यंत होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये एत्तदेशीय पळशी , ब्राह्मण , पठारे प्रभू , पाचकळशी, माळी ,ठाकूर ,भोई व आगरी जमातीची मंडळी होती.
मुंबईत ज्या कापडाच्या सुताच्या गिरण्या निघाल्या त्यामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढण्यास मदत झाली. श्री कावसजी नानाभाई दावर यांनी १८५४ च्या फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे स्पिनिंग and व्हीव्हिंग कंपनी व पायोनियर स्पिनिंग फॅक्टरी येथे निघाली तेंव्हापासून मुंबई च्या लोकसंख्येत सतत वाढ होऊन ती १९२१ ते १९३१ च्या दरम्यान  सुमारे ११ लाखांचे वर गेली.


मुंबादेवी - मुंबईचे कुलदैवत

मुंबादेवीचे मंदिर सुरवातीच्या काळात बोरीबंदर स्थानकाजवळ फाणसी तलाव होता त्यालगद होते. इ.स. १७३७ साली जेंव्हा मुंबई भोवतीच्या किल्ल्याचा विस्तार करण्याचे ठरवले गेले तेंव्हा तत्कालीन सरकारने हे मंदिर हलवून ते सध्याच्या काळबादेवी भागात नेण्याचा आदेश दिला . ह्या मंदिराचे बांधकाम सन १७५३ मध्ये पांडू सोनार नावाच्या प्रख्यात मराठी व्यापाऱ्याने केले.

आधुनिक मुंबईचा जन्म :

साधारणपणे १८३० च्या काळात निसर्ग सौन्दर्याने नटलेले केवळ अडीच लाख लोकवस्तीचे टुमदार मुंबई शहर साडेचार चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. किल्ल्याच्या तटबंदिबाहेर एक हजार यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती. त्यावेळी जे काही घडत असे ते या बंदिस्त किल्ल्यातच. पण १८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण परळला हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळ जवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीट वर राहून मुंबईचा कारभार बघत असे.गव्हर्नर परळ ला गेल्यावर काही श्रीमंत लोकही परळ , माझगाव , भायखळा आणि मलबार हिल या भागात जाऊन राहू लागले. 
इ.स. १८३९ मध्ये मुंबईचा ग्रँट रोड बांधला गेला. गव्हर्नर रॉबर्ट  ग्रँट यांच्या स्मरणार्थ या रस्त्याचे नावं ग्रँट रोड ठेवण्यात आले.इ.स. १८३८ मध्ये ह्याच्याच आदेशावरून कुलाबा कॉजवे बांधला गेला. त्यामुळे मुंबईहून कुलाब्याला जा ये करताना खाडीत उतरून जीव धोक्यात घालण्याचा धोका टळला. इ.स. १८३५ मध्ये मुंबईत पहिल्यांदाच प्यायचा सोडा मिळू लागला. आणि २ वर्षांनी बर्फ आला.सन १८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल  सेवा सुरु झाली.

मुंबईत आगगाडी :
शनिवार दि. १६ एप्रिल १८५३ रोजी संपूर्ण आशिया खंडातली पहिली आगगाडी बोरीबंदर स्टेशनातून धुराची वलये सोडीत दिमाखाने ठाण्याकडे निघाली. बोरीबंदर ते ठाणे हा चोवीस मैलांचा लोहमार्ग टाकण्यासाठी ग्रेट इंडियन पेनिन्शुला या कंपनीने दहा हजार पौंड खर्च केले. जेम्स बर्कले नावाचा इंग्रज इंजिनियर ह्या कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केला गेला होता.

व्ही.टी. चा जन्म :
एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या ३० वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली. बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ठ वास्तुशिल्प. ह्या इमारतीच्या शिल्परेखानाचे काम एफ . डब्ल्यू. स्टीव्हन्सन या वस्तू विशारदाने केले. ही इमारत म्हणजे इटालियन वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. २० जुने १८८५ रोजी व्हिक्टोरिया राणीच्या गौरवार्थ या इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नावं देण्यात आले.

मुंबईत ट्राम :

आज पन्नाशीच्या जवळपासचे मुंबईकर एका काळी ट्राम च्या वरच्या मजल्यावर बसून एक आण्यात आख्खी मुंबईची केलेली सफर आठवून म्हणत असतील 'गेले ते दिवस'.
मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर अशा दारात हा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी या ट्राम ने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. घोड्याची ट्राम सुरु होण्यापूर्वी मुंबईत मुख्य वाहतुकीचे साधन म्हणजे मेणे व छकडे होते. घोड्याने चालवलेला टांगा हे वाहन १८८० मध्ये मुंबईत प्रथम आले. मुंबईकर याला टांगा  म्हणण्यापेक्षा 'व्हिक्टोरिया' हे भारदस्त इंग्रजी नावं देत असे.
मुंबईत ट्राम ही प्रथम मुंबईच्या व्यापारी विभागामध्ये सुरु केली गेली. कुलाबा क्रॉफर्ड मार्केट, पायधुणी आणि बोरीबंदर , काळबादेवी आणि पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. सन १९०७ साली ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्राम चे शेवटचे ठिकाण दादर चे खोदादाद सर्कल होते. म्हणूनच ट्राम संपुष्टात येऊन इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही कानावर येते.

७ मे १९०७ रोजी सुरु झालेली विजेवर चालणारी ट्राम तारीख ३१ मार्च १९६४ पासून बंद करण्यात आली आणि जलद वाहतुकीसाठी बस गाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले. बस वाहतूक १५ जुलै १९२६ पासून सुरु झाली होती. पहिली बस कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर सुरु झाली. हे अंतर पार करायला बसला फक्त १० मिनिटे लागत. तोपर्यंत मुंबईत टॅक्सी हे भाड्याचे वाहन रूढ झाले होते. १९३७ साली दुमजली बसगाड्या सुरु झाल्या. मुंबई ती मुंबई तिची सर भारतातील एकही शहराला नाही हा लौकिक मुंबई ला मिळवून देण्यात मुंबईच्या रेल्वे प्रमाणे बस वाहतुकीचा ही मोठा वाटा आहे.

मुंबईच्या उपनगरांचा उगम :

मुंबईतील कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बी. आय. टी. ने ( बॉम्बे सिटी इम्रूव्हमेट ट्रस्ट ) चाळी बांधण्यास सुरुवात केली. आणि मुंबईकरांच्या जीवनात चाळकरी संस्कृती जन्माला आली. सन १९२० मध्ये महार लोकांसाठी पहिली चाल भायखळ्याच्या क्लार्क रोडवर बांधली गेली.  बी. आय. टी. ने बांधलेल्या ह्या खोल्या चांगल्या हवेशीर व सिमेंट कॉंक्रीटच्या असत. मासिक भाडे ५ रुपयांच्या वर जाणार नाही अशा बेताने आकारले जाई. सन १९२४ साली १६५४४ बिऱ्हाडांची सोय करणाऱ्या २०७ चाळी बांधल्या गेल्या. त्यानंतर साल सेटे बेटामध्ये उपनगरे वसवण्याची भव्य योजना या विकास मंडळाने आखली. त्यावेळी जी उपनगरे तयार झाली त्यात तुर्भे , दांडा, खार , चॅपल रोड , वांद्रे आणि सहार ही उपनगरे होती.

मुंबईतल्या पश्चिम विभागातल्या इतर उपनगरांचा विकास हा या मंडळाकडे न सोपवता त्यासाठी एक निराळे मंडळ स्थापन केले गेले. त्याचे नावं 'बॉम्बे टाऊन प्लॅनिंग स्कीम' असे होते. या योजनेसाठी लागणारा पैसा मालकांनीच उभा केला. यात वांद्रे ते बोरीवली या भागासाठी आखलेल्या एकंदर सत्तावीस योजनांपैकी एकोणीस योजना पुऱ्या झाल्या. यातील ५ योजना वांद्रे व सांताक्रूझ येथे , ६ विलेपार्ले व ५ अंधेरी येथे झाल्या. १९३० साली वांद्रे , खार, सांताक्रूझ , चेंबूर येथे काही छोटेखानी गावेही तयार करण्यात आली.

मुंबईच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या गेल्या ३० वर्षांत बाहेरून आलेल्या लोकांनी वाढवली आहे. या सर्वाना औद्योगिकीकरणामुळे नोकऱ्या उपलब्ध झाल्या. १९५० नंतर लोकसंख्या फोफावली तसा मुंबईचा विस्तार आणि व्याप अफाट वाढला , भारत कुमार राउत यांनी  लिहिलेले आहे त्याप्रमाणे  दुख: एकाच गोष्टीचे वाटते की या मुंबईने करोडोना भरभरून दिले आहे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेण्यास मात्र कोणी पुढे येत नाही. कारण या शहराला सर्वानीच केवळ आश्रय स्थान मानलं. ते माझ घर आहे असं मानणार फारस कोणीच नाही . शहराच्या वेगाने होण्याऱ्या -हासाच हेच तर मूळ कारण आहे. मुंबई टिकावी आणि संपन्न राहावी हीच प्रार्थना!!

धन्यवाद !

-संकलित

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla