कोळ्यांची हावलूबाय.....    

fishermens holi in mumbaiहवलूबाय हवलू बाय तुझ्या शाराचं नाव काय! शाराचं नाव मुंबय शर तुझ्या पाटलाचं नाव काय! हे गाण तुम्ही हमखास ऐकलच असाल. अशी “हावलूबाय” म्हणजेच होळीवर रचलेली पारंपारिक गाणे हुळूहळू तुमच्या कानावर पडत असतीलच ना.. होळी...म्हणजे होलिकोत्सव... तमाम कोळी-आगरी बांधवांसाठी हा दिवाळी इतकाच महत्वाचा  सण.

मुंबईतील चेंबूर चा ट्रौम्बे कोळीवाडा असो कि मुंबई उपनगराजवळील वर्सोवा, माहीम कोळीवाडा तर वसई, पालघर कोळीवाडा असो.. येथील कोलीराजाने आपलं गाव आणि आपली संस्कुती जपली आहे. दर्या राजाला देव मानणारे, रोजच्या धकाधकीतून वेळ काढून प्रत्येक सण साजरे करणारे हे कोळीबांधव सर्व सणाप्रमाणे होळी हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. कोळी बांधवाच्या भाषेत सांगायचे झाले तर होळी म्हणजे हवलूबायचा सण आणि रंगपंचमी म्हणजे शिमगा म्हणून ओळखला जातो. शहरात होळी मंगळवारी असली तरीही या कोळीवाड्यात मात्र ती कधीच सुरु झाली आहे. समुद्राच्या किनारी पोरा-टोरांची होळी, कॉबर होळी रंगात आली आहे. प्रत्येक कोळीवाड्यातील होळीचे वैशिष्ट्य वेगळे असून त्याची गंमतहि वेगळी आहे.

 हावलूबायचा सण हा कोळीवाड्यात पारंपारिक पद्धतीने पार पडला जातो. दिवाळी प्रमाणेच दुसरा महत्वाचा असलेल्या या सणात कोळीबांधव आपल्या उपजीविकेची साधन असलेल्या होड्यांची पूजा करतो. तिची रंगरंगोटी करून तिला नववधूप्रमाणे सजवले जाते तसेच तिला बावटे म्हणजेच मासे, पुरणपोळ्या, नारळापासून बनवलेल्या करंज्या, घाऱ्या या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. तर मद्याची बाटली आणून तिला “धार” दिली जाते. या काळात बोटी बंद ठेवल्या जातात.

 

 असा पारंपारिक लहुजा असलेल्या या होलिकोत्सवात होळी उभारण्याची प्रथा वेगळी असली तरीही यावेळी परिधान केलेले पारंपारिक पोशाख हे सारखेच असतात. त्याचप्रमाणे या सणाला गावात होळीच्या आधी ज्या मुलींचे लग्न झाले असेल त्या जोडप्यास मान असून होळीला अग्नी लाग्ल्यानंतर सर्व प्रथम हे जोडपे प्रदक्षिणा घालते आणि मग गावकरी कुटुंबासहित या होळीला नारळ आणि ऊस वाहतात. काहीजणांकडे माश्याचे, चिंबोरिचे, बोयरिचे तोरण होळीला मान म्हणून देतात. तरुण मुले ‘अबबबब’ असा आजव काढून ओरडतात. त्यानंतर सर्व आपल्या घरी जेवायला येतात. जेवणात तांदळाच्या पिठाचे मोदक व पुरणपोळ्या तयार केल्या जातात. होळीला शिंगोल्याचा म्हणजेच नारळापासून बनवलेल्या करंज्या, पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशा या आगरी-कोळ्यांची होळीची मज्जा काही औरच असते. अशाच आपल्या शेजारील काही कोळीवाड्यातील सुरु असणऱ्या या पारंपारिक होळीची धम्माल आपल्या वाचकांसाठी....  

वर्सोव्यातील होळी:-

holi celebration in mumbai koliwada 1मुंबई उपनगरातील सर्वात जवळील कोळीवाडा म्हणजे वर्सोवा कोळीवाडा.. भव्य समुद्र किनारा लाभलेल्या या वर्सोवा कोळीवाड्यातील होळी हि पारंपारिक म्हणावी लागेलं...अशा या पारंपारिक होळीची प्रथा हळूहळू बदलत गेली आहे. येथे पूवी १५ दिवस साजरी होणारी होळी आता पाच दिवसात साजरी केली जाते. ३ दिवस लहान पोरांची होळी, एक दिवस कोंबर होळी आणि शेवटच्या दिवशी सर्वांची होळी असे या पारंपारिक होळीचे स्वरूप असते. येथे पूर्वी होळीचे झाड खांद्यावर घेऊन वाजत-गाजत आणले जात असे, परंतु येथील रहिवाश्यांनी आता वृक्षतोड थांबवण्यासाठी रानात वाढलेल्या रानटी भेंडीची फांदी आणली जाते. महिला कोळी साडीत तर पुरुष लंगोटी-गंजी टोपी अशा पारंपारिक वेशात या होळी जवळ जमतात. गाण्याचा तालावर नाचण्यात दंग होतात. त्याचप्रमाणे येथील कोळी बांधव या दिवशी आपल्या होडीची पूजा करून तिच्या मागच्या आणि पुढच्या टोकावर पुरणपोळी आणि मद्याचा नैवेद्य ठेवतात. होळीच्या पूजेचा पहिला मान गावच्या पाटलाचा असून मग नवविवाहित जोडप्यांचा असतो. होळी रात्री १२ ला पेटवली जात व त्यानंतर सर्व कोळीबांधव आपल्या पारंपारिक गाण्याचा तालावर नाचण्यात दंग होतात. ज्या दिवसापासून होळीला सुरवात तेव्हा पासून होडीला मासे म्हणजे बावटे लावले जातात आणि ज्या दिवशी सर्वांची होळी असते त्या दिवशी कोळी बांधव हे मासे घेऊन परतात. होळीचे लाकूड ज्या दिशेला पडते त्या दिशेला मोठ्या प्रमाणात मासे सापडतात, अशी येथील कोळीबांधवांची श्रद्धा आहे. 

खारदांडा येथील होळी:-

       मुंबई उपनगरातील सर्वात जुना कोळीवाडा म्हणजे खारदांडा कोळीवाडा.. या कोळीवाड्यातील वारेन पाड्यात होळीचा सण हा इतर कोळीवाड्याच्या तुलनेत दोन दिवस आधीच साजरा केला जातो. अशी वेगळी परंपरा असणारी मुंबईतील हि एकमेव होळी आहे. येथील कोळीवाड्यातील वारेन पाड्यातील होळीला ब्रिटिशांची परंपरा असून याची एक वेगळीच कथा आहे. ब्रिटिशांच्या काळात या कोळीवाड्यात प्रथेप्रमाणे होळी साजरी होताना काही मुलांनी या होळीत विहिरीवरचा लाकडी रहाट टाकला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशा वेळी गावाला शिक्षा म्हणून ब्रिटीश अधिकाऱ्यांनी येथील “पारंपारिक कोळीच्या दोन दिवस अगोदर होळी साजरी करावी व ज्यादिवशी सर्वजण होळीचा उत्सव साजरा करतील त्यादिवशी तुम्ही शांत राहायचे” असा आदेश दिला. तेव्हापसून आजपर्यंत होळीच्या दोन दिवस आधी वारेन वाड्यात होळी साजरी करण्याची परंपरा आहे. या घटनेला असंख्य वर्षे उलटून गेली तरी अश्याच प्रकारे होळी साजरी केली जाते...

माहीम कोळीवाड्यातील होळी:-

 kolyanchi holi in mumbaiअनेक पारंपारिक होलीपैकी एक म्हणजे माहीम कोळीवाड्यातील होळी. येथे ३ दिवस मध्ये होळी साजरी केली जाते. पहिल्या दिवशी मुलांची होळी, दुसऱ्या दिवशी कोंबर होळी आणि तिसऱ्या दिवशी सर्वांची होळी अशी येथील पारंपारिक होळीचे स्वरूप.. होळीच्या एक दिवस आधी सुपारीच्या झाडाचे खोड होळीसाठी वाजतगाजत आणले जाते. त्याला हळद लावून आंघोळ घालून साडी नेसवून नटवले जाते. तसेच त्यावर देवीचा मुखवटा चढवला जातो. होलीभोवती महिला नृत्य करतात. घुमट नावाच्या चर्मवाद्याच्या तालावर हे नृत्य केले जाते. येथील होळी हि पहाटे पाचच्या सुमारास पेटवली जाते. तोपर्यंत महिलांची नाच-गाणी सुरूच असतात. या होलिका मातेला पुरणपोळी, करंजी, उकडलेले चणे, आणि मुळासकट असलेला ऊस नैवेद्य म्हणून दाखवला जातो. होळी पडली कि नंतर कोळी बांधव आपल्या होड्यांची पूजा करतात.


चेंबूर कोळीवाडा होळी:-   

             चेंबूर येथील पारंपारिक होळी हि नऊ दिवस चालू असते. येथे होळीला “हौल” असे संबोधले जाते. या नऊ दिवस चालणाऱ्या होळीच्या उत्सवात सर्वात जास्त मज्जा असते बच्चेकंपनीची.. गावातील सात छोट्या-मोठ्या होळ्या पेटवण्याची जबाबदारी यांच्या कडे असून हि मुले गाणी म्हणजे गोंगाट करत घरोघरी जाऊन लाकडे गोळा करतात. त्याचबरोबर गावातील तरुण मुले आठवी होळी लावतात. सकाळपासूनच गावात विविध खेळ, पारंपारिक गाणी व नृत्यांची मेजवानी असते. नव्या होळीच्या पूजेचा मान हा नवीन जोडप्यांचाच असतो. यावेळी नारळाचे जोड वाहून हि जोडपी नवस करतात. होलिका देवीला पापड्या, रव्याच्या करंज्या, पुरणाची पोळी, पाच प्रकारची मिठाई आणि पाच नारळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच कोळी बांधव आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या होडीची पूजा करून तिला नैवेद्य म्हणून पुऱ्या, मच्छी, पोळ्या आणि गावठी दारूची धार लावावी लागते. धार लावणे याला त्याच्याभाषेत “भान लावणे” म्हणतात. तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी होळी जळल्यानंतर राख असलेल्या खड्यात गावठी दारूची धार आणि पाणी सोडले जाते व हि राख रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर टाकून रंगपंचमी साजरी केली जाते.


वरळी कोळीवाडा होळी:-

         वरळी कोळीवाड्यात साजरी केली जाणारी होळी हि अन्य कोळीवाड्याप्रमाणेच साजरी केली जाते. होळी भोवती असणारया महिला या एकाच रंगाच्या साड्या नेसतात. होळीला कलिंगड, पुरणपोळी, उकडलेले चणे, वाटणे यांचा नैवेद्य दाखवून तो सर्वाना प्रसाद म्हणून वाटला जातो. तसेच नंतर महिला या डोक्यावर रंगवलेले व नक्षीकाम केलेले मडके घेऊन मिरवणूकीत नाचण्यात दंग होतात. तर या कोळीवाड्यातील कोळी बांधव एक दिवस अगोदर मध्यरात्री १२ वाजता होळी पेटवून आपली होळी परंपरा जपतात.


                                                                                                                -प्रसाद प्रभाकर शिंदे

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email :  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla