टाळकुटे - देश कुठे ?

सर्वप्रथम  आपण एक गोष्ट स्वत:सोबत (तरी) स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आपण हा देश 'चालवण्यास' खऱ्या अर्थाने पात्र आहोत का ?स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर असा कटू सवाल कदाचित काहींना पचणार नाही. पण औषध कडू असते , आणि त्यामुळे ती मात्रा लागू पडते. वास्तविक पाहता अशावेळी आपला देश किती प्रगती करतोय, विविध क्षेत्रात आपण कसे पुढाकार घेत आहोत. देश कसा विकसनशील आहे वगैरे गमजा मारण्यात काही मजा नाही. कारण 'विकसनशील' वगैरे असे काही असत नाही. एक तर तुम्ही विकसित असता किंवा नसता. 'विकसनशील' वगैरे हा शब्दच्छल आहे. कवी कल्पना आहे. स्वातंत्र्यापासून देश फक्त या आणि अशाच शब्द्छलावर चालत आहे.  

भौतिक प्रगती भानाजे विकसितपणा आहे म्हणणे सुद्धा आततायीपणाचे ठरेल. पण भौतिक सुखाकडे पाठ फिरवणे देखील मूर्खपणाचेच नाही का होणार ? अन्  हा देश (पक्षी : आपण) याच 'क्रायसिस' मध्ये अडकून पडला आहे.आपल्याला अजून ठरवता नाही आलेले की नेमके काय मिळवले की आपण समाधानी होऊ शकतो. ('सुखी' होऊ असे नाही म्हणत , कारण व्यक्ती परत्वे सुखाची संकल्पना बदलू शकते.) सामाजिक दरी दिवसागणिक रुंदावत आहे. धर्म - जातीच्या भिंती पुढची अनेक शतके अबाधित राहतील याची तजवीज आज देखील केली जात आहे. शिक्षणाच्या नावाने जो काही सावळा गोंधळ इतकी वर्षे अव्याहतपणे सुरु आहे , त्याबद्दल अधिक काही सांगणे नलगे. त्यामुळे गेल्या अनेक पिढ्यांतून फक्त कारकुनांची संख्या आपण वाढवली. या शिक्षणाने आपण साक्षर झालो. सुसंकृत नाही.

कारण शिक्षणाची ताकद आपण ओळखली आहे असे आजही ठामपणे नाही सांगता येत. अजूनही आपण चमत्कारांनाच नमस्कार करताना दिसतो. त्यामुळे भोंदू बाबा , बुवा , अम्मा, दिदी यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते आहे. 'ज्ञानेश्वरी' तील एकही ओवी माहित नाही, मात्र रेड्यापासून ते भिंतीपर्यंतचे सगळे चमत्कार पाठ असलेल्यांना हे कधी कळेल का की, ज्या काळात आपण भिंत चालवण्याच्या चमत्काराला नमस्कार करत होतो तेंव्हा भिंतीपलीकडील देशांत गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता. रसायन शास्त्र , भौतिक शास्त्र, खगोल विज्ञानात महत्वाचे संशोधन सुरु होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात शास्त्रज्ञ , तत्वज्ञ विविध विषयांवर मौलिक वाद घालत होते. अन् आपण मात्र चामात्कारांप्रती टाळ वाजवत, गुणगान करत तथाकथित धर्म - जातीने मान्य-अमान्य केलेला आपापला कोपरा भरून काढण्याचे काम इमानेइतबारे करत होतो. आणि तसेही आपल्याकडे कीर्तन - निरुपण करणाऱ्याच्या मागे  टाळ वाजवणाऱ्या टाळ कुट्यान्चीच संख्या अधिक. फार काही विचार न करता किर्तनकार बुवाला 'ताल' देणारे टाळकुटे आणि वैचारिक स्वातंत्र्य गमावून बसलेल्या आपल्यासारख्यांमध्ये फार काही फरक आहे असे वाटत नाही. नाहीतरी , स्वतंत्रपणे विचार करणारे तसे नेहमीच एका हाताच्या बोटावर मोजावेत एवढे असतात. बाकीचे बहुतांश राजकिय नेत्यांची खुशामत करत पद आणि पत मिळवतात. अर्थात याला आपण जबाबदार आहोत अन्  हे आपल्याला कळत नाही असे नाही.पण ' मला काय त्याचे' ही भावना जन्मापासूनच आपल्यात  एवढी भिनवलेली असते की मग आपणास खरच 'त्याचे काही वाटेनासे होते'. म्हणून मग हा प्रश्न उरतोच की, हे बदलण्यासाठी आपण खरच काही करणार आहोत की नाही ?

धन्यवाद !

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(www.mumbaipuneonline.com या इ मासिकातील (अंकातील ) लेखकांच्या मतांशी संपादक सहमत असेलच असे नाही.)

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla